बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाण्यामध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री दोन जण घरात घुसले. आरोपींनी विळ्याचा धाक दाखवत पीडितेवर तिच्या नव-यासमोरच आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे बुलडाणा हादरले. या प्रकरणी २ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून १९ वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके नियुक्त केली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून आरोपींनी हे भयंकर कृत्य केले.
पीडित महिला आणि तिचा नवरा एका शेतात कामासाठी वास्तव्यास असून तेथे मजुरीचे काम करतात. रात्री दोघेही घरात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात चाकू, तर दुस-याच्या हातात विळा होता. शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी नवरा-बायकोला घराबाहेर शेतात ओढत नेले. तेथे महिलेच्या नव-याला रोखून धरत दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















