35.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंची बालेकिल्ल्यातच कोंडी?

शिंदेंची बालेकिल्ल्यातच कोंडी?

- ठाण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ - सक्षम उमेदवार मिळेना

ठाणे : प्रतिनिधी
कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा तिकिट मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांनी आणि पदाधिका-यांनी शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता त्यांनी युतीधर्म म्हणून तलवारी म्यान केल्या आहेत. पण शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप, सेनेत चढाओढ आहे. त्यामुळे शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या ठाण्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. एकीकडे ही जागा आपल्याकडे राहावी, यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे भाजपने या जागेवर दावा केला आहे.

ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. आगामी निवडणुकीत तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. मात्र, महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिंदेंचे राजकीय गुरू आनंद दिघे यांची कर्मभूमी असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यास शिंदे तयार नाहीत. मात्र, येथील सेनेच्या इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावर अवलंबून असेल. शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि प्रवक्ते, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, या प्रत्येक उमेदवाराच्या मर्यादा आहेत.

म्हस्के यांचा प्रभाव ठाणे शहरापुरता मर्यादित आहे. पक्षातील पदाधिकारी, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतील, अशी म्हस्के यांची अपेक्षा आहे. पण सेनेचे काही पदाधिकारी त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत म्हस्के यांनी आक्रमक विधाने करत अनेकांची मने दुखावली आहेत. ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक त्यांचा मतदारसंघ आणि ठाण्याच्या पलीकडे फार प्रभावी ठरतील, असे चित्र नाही तर रवींद्र फाटक यांना ठाणे शहर मतदारसंघातून विधानसभेला पराभव पत्करावा लागला. स्वकीयांकडूनच त्यांना दगाफटका सहन करावा लागला. ठाणे लोकसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नाही.

भाजपचे संजीव नाईक इच्छुक
भाजपकडून विनय सहस्रबुद्धे आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नावांची चर्चा आहे. संजीव नाईक मागील ४ वर्षे कुठेच दिसले नव्हते. पण गेल्या वर्षभरापासून ते ठाण्यासह संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पण त्यांना मिळणारा प्रतिसाद मर्यादित आहे. सहस्रबुद्धे सुशिक्षित आहेत. भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. पण त्यांचा मतदारसंघाशी फारसा परिचय नाही. त्यांनी आता मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची एक मर्यादा आहे. त्यातच या जागेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची अडचण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR