नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. पूजा बनसोडे असे शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुख यांचे नाव असून त्यांना खंडणी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबईतील इंदिरानगर तुर्भे येथील स्क्रॅपचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पूजा बनसोडे यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार, हुसेन शेख यांना बरोबर घेऊन ठाकूर यांच्या दुकानात जाऊन त्यांच्यासह दुकानात काम करणा-या कामगाराला मारहाणही केली होती.
यावेळी सर्वेंद्रकुमार ठाकूर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा पूजा बनसोडे यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पूजा बनसोडे यांना अटक केली असून त्यांच्यासोबत असलेल्या इतर ३ आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
















