Homeसोलापूरशिंदे सेनेसोबत युती राष्ट्रवादीसाठी आत्मघाती ठरेल

शिंदे सेनेसोबत युती राष्ट्रवादीसाठी आत्मघाती ठरेल

माजी नगरसेवक रियाज खरादी यांचा इशारा, निवडणूक न लढण्याची घोषणा

सोलापूर : एकीकडे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. तर दुसरीकडे पक्षाचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत बंडखोरीचा इशारा दिला आहे.

युतीची घोषणा झाल्यानंतर खरादी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी निर्णयावर तीव्र नापसंती दर्शवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आज मुस्लिम समाजाचा मोठा वर्ग त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे. मुस्लिम समाजातील अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीमुळे राष्ट्रवादीचे फार मोठे राजकीय नुकसान होईल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. युती केल्यास आपण प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक न लढवता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. युती झाल्यास मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांच्यासारखे ज्येष्ठ मुस्लिम नेते आहेत. अजित पवार यांच्या मुस्लिम समाजासाठी ठोस भूमिका घेत सना मलिक, इद्रिस नाईकवाडी आमदार झाले. हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री झाले. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक १४, १५, १६, १७ आणि २० या प्रभागांतून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येण्याची मोठी शक्यता आहे. मात्र, जर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी यांची युती झाली, तर या प्रभागांमध्ये चुकीचा संदेश जाईल. विरोधी पक्ष याचा गैरफायदा घेत उलटा प्रचार करेल आणि त्याचा थेट तोटा राष्ट्रवादीला सहन करावा लागेल, असे खरादी म्हणाले.
पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे सेनेने पाठिंबा दर्शविल्याचा आरोप करत, अशा पक्षाशी जर राष्ट्रवादीने युती केली, तर मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण होईल, मी देखील पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही असेही स्पष्ट केले.

मुस्लिम समाजाचे नेतृत्व करण्याची संधी द्या

मला मुस्लिम समाजाचा आणि त्याहूनही अधिक अभिमान हिंदुस्तानी असल्याचा आहे. आतापर्यंत मुस्लिम समाजाचे नेतृत्व चुकीच्या हातात गेले. आता समाजाने एकदा मला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. त्यानंतर समाजासाठी मी काय करतो, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवेन, असे आवाहन रियाज खरादी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR