मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लबमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
शिल्पा शेट्टीचा बॅस्टियन क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा त्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. या व्हीडीओत मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी व मद्यधुंद वातावरण दिसून येत आहे. याचवेळी काही तरुण व तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सर्वांपुढे अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे कृत्य सुरू असताना क्लबमध्ये त्यांच्या आजूबाजूला क्लबमध्ये आलेल्या अनेकांची उपस्थिती होती. हे कृत्य पाहून अनेकांनी तेथून बाहेर पडणे पसंत केले. तर काहींनी या घटनेचा व्हीडीओ तयार करून व्हायरल केला.
दुसरीकडे, हा व्हीडीओ केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दिव्य मराठी त्याची पुष्टीही करत नाही. पण या व्हीडीओचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि एवढ्या गर्दीत चाललेल्या या ओंगळवाण्या प्रकारावर पुणेकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषत: पालकांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे.
शहरातील तरुण पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन नेमक्या कोणत्या दिशेने चालली आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. क्लबमध्ये असे प्रकार राजरोसपणे सुरू असताना क्लब प्रशासनाचे याकडे लक्ष कसे गेले नाही, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
















