मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, जवळपास दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ८३ हजारांच्या पातळीवर आला आहे. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल ११.५६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे ४७० अंकांनी घसरून ८३,७०८ च्या आसपास पोहोचला. सकाळी सेन्सेक्स ८४,०२२ वर उघडला होता, तर गुरूवारी तो ८४,१८१ वर बंद झाला होता. दुसरीकडे निफ्टीमध्येही घसरण कायम राहिली. व्यवहारादरम्यान निफ्टी १४१ अंकांनी घसरून २५,७३५ पर्यंत आला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सातत्याने शेअर्स विकत आहेत. गुरुवारी त्यांनी सुमारे ३,३६७ कोटी रुपयांची विक्री केली. जानेवारी महिन्यात आतापर्यंत एफआयआयनी ८,०८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाजारातून काढली आहे. टॅरिफबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे भारतावर जादा टॅरिफ लावले जाऊ शकतात, अशा चर्चांमुळेही बाजारात दबाव निर्माण झाला आहे. अंदाजानुसार टॅरिफ ५०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, ही भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताचा आयात खर्च आणि महागाई वाढण्याची शक्यता असते, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. याशिवाय रुपयावरही दबाव आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ८९.९७ पर्यंत गेला.

