पुणे : प्रतिनिधी
डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचा-यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील सुमारे दहा हजार डॉक्टरांनी संपाची हाक दिली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुणे शाखेच्या नेतृत्वाखाली हा संप २० जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होऊन २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. या संपामुळे जिल्ह्यातील अनेक खाजगी रुग्णालयांमधील नियमित वैद्यकीय सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संघटनांकडून देण्यात आली आहे.
डॉक्टर संघटनांनी सांगितले की, आरोग्यसेवा देणा-या कर्मचा-यांवर वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संपाच्या माध्यमातून डॉक्टर संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत.
डोंबिवलीतील घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्र मेडिकेअर संरक्षण कायदा अधिक प्रभावी आणि कडक करण्यात यावा, तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांवरील हिंसाचाराविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करून सुरक्षित आणि निर्भय वातावरणात काम करण्याची हमी सरकारने द्यावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे. या संपामुळे नियमित आरोग्य सेवांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यकतेनुसार वैद्यकीय नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
















