लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी पावसाळयात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठ भूजल विभागाच्यावतीने सप्टेंबर अखेर भूजल पातळीची तपासणी केली आहे. या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत ४.५८ मिटरने घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर अखेर जिल्हयातील भूजल पातळीची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत ४.५८ मिटरने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
औसा, निलंगा, लातूर तालुक्याच्या भूजल पातळीत झाली सर्वाधिक घट
जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्यावतीने वर्षातून चार वेळा भूजल पातळी तपासली जाते. सप्टेंबर महिण्यामध्ये झालेल्या भूजल पातळीच्या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत ४.५८ मिटरने भूजल पातळी घट झाली असल्याचे दिसून आले. यात औसा तालुक्याची सर्वाधिक ५.४८ मिटरने भूजल पातळी घट झाली आहे. तसेच लातूर तालुक्याची ५.४६ मिटर, निलंगा तालुक्याची ५.२८ मिटर, उदगीर तालुक्याची ४.५८ मिटर, अहमदपूर तालुक्याची ४.५४ मिटर, चाकूर तालुक्याची ४.४९ मिटर जळकोट तालुक्याची ४.४३ मिटर, रेणापूर तालुक्याची ४.२० मिटर, शिरूर अनंतपाळ तालुक्याची ४.१० मिटर, देवणी तालुक्याची ३.१८ मिटरने भूजल पातळीत घट झाली आहे.
जिल्ह्यात ३५७.५ मि. मी. पाऊस
लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी ३५७.५ मिमी पाऊस झाला आहे. जळकोट तालुक्यात ५५४.८ मिलीमिटर पाऊस पडला आहे. तसेच उदगीर तालुक्यात ४७१.३ मि.मि., अहमदपूर तालुक्यात ३८२.२, रेणापूर तालुक्यात ३६८.७ मि.मि., शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३०५ मि.मि., लातूर तालुक्यात ३३०.४ मि.मि., निलंगा तालुक्यात ३३४.६ मि.मि., चाकूर तालुक्यात ३१३.४ मि.मि. देवणी तालुक्यात ३१२.५ मि.मि., औसा तालुक्यात २९९.६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी दमदार पाऊसाची गरज आहे.
पावसाअभावी ओढे, नाले, नद्या कोरड्या
लातूर जिल्हयात जून महिण्यात पावसाला सुरूवात झाली मात्र या पावसात सातत्य राहिले नाही. त्यामुळे अद्याप, ओढे, नाले, नद्या कोरडया असल्याने भूजलपातळीत म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणी टंचाईवरही परिणाम झाला आहे. सध्या जिल्हयातील ९ तालुक्यातील २३० गावे, वाडयावर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस न झाल्यास यात आणखी वाढ होणार आहे.
२०१५ च्या तुलनेत या वर्षी ०.२१ मीटरने भूजलात वाढ
लातूर जिल्हयात जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या टिमने सप्टेंबर २०१५ साली भूजल तपासणी केली असता ६.४५ मिटर भूजल पातळी नोंदवली गेली. तर सप्टेंंबर २०२६ मध्ये ६.२४ भूजल पातळीची नोंद झाली. २०१५ च्या तुलनेत २०२६ रोजी ०.२१ मिटरने भूजल पातळीत कमी घट झाल्याचे दिसून येत आहे. १० वर्षापूर्वी पाऊस कमी झाल्याने जिल्हयात पहिल्यांदाच रेल्वेने पाणी आणण्याची पाळी आली होती.
भूगर्भातील पाण्याचा जपून वापर करावा
लातूर जिल्हयात यावर्षी कमी पाऊस झाला आहे. तसेच पिकांना वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याचा उपसा झाल्याने अनपेक्षितपणे भूगर्भातील भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे नागरीकांना आगामी काळाची पारिस्थिती पाहता भूगर्भातील पाण्याचा जपून वापर करावा. तसेच भूपृष्ठावरील पाण्याचाही काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रदिप नागरगोजे यांनी सांगीतले.
















