नवी यादी जाहीर, अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि ग्राऊंड ट्रंथिंग करून तातडीने अहवाल तातडीने देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता उर्वरित तालुक्यांमधील स्थितीवरही नजर ठेवली जात आहे. या १९ तालुक्यांमधील प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करून प्रशासनाने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळ सर्वेक्षणासाठी निवडलेल्या १९ तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर तालुक्यांचा समावेश आहे. यासोबत चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भडारा, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांतील तालुक्यांचाही समावेश आहे.
आगामी काळात जनावरांच्या चा-याची भीषण टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन करण्यास सुरू केले आहे. यासोबतच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्यास तिथे तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.
नांदेडसह ८ जिल्ह्यांतील
तालुक्यांची घेतली दखल
नांदेड : मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर
चंद्रपूर : जिवती, ब्रम्हपुरी आणि बल्लारपूर
गोंदिया : आमगाव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया
वर्धा : कारंजा
भंडारा : मोहाडी आणि तुमसर
नाशिक : त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड
सातारा : पाटण
सांगली : शिराळा आणि वाळवा
















