मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
परभणी : प्रतिनिधी
कुणबी प्रमाणपत्रासाठी आलेल्या प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र द्या, याच अधिवेशनात सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाजामुळेच हे सरकार सत्तेवर आले. सरकारने न्याय नाही दिला तर २०२९ मध्ये हाच समाज भाजपाला पायउतार करेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी परभणीत दिला.
परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. आज याच शेतक-यांना मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आणि आणि शेतक-यांशी चर्चा केली. आपले म्हणणे सरकार दरबारी मांडले पाहिजे, असेही मनोज जरांगे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली. महसूलमंत्र्यांसोबत शेतक-यांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले. शेतक-यांना जर शक्तिपीठ महामार्गाला जमिनी द्यायच्या नसतील तर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारने जीआर काढला. पण त्याची अंमलबजावणी अधिकारी, कर्मचारी करत नाहीत. मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज येऊन पडले आहेत. पण त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीसाठीही अडवणूक केली जाते. सरकारकडून याविषयी अद्याप कारवाई करण्यात आली नाही, असे ते म्हणाले.
गॅझेटची अंमलबजावणी
तातडीने करा : जरांगे
दरम्यान, याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक परिपत्रक काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली जातील. त्याचबरोबर सातारा गॅझेट, औंध गॅझेटची अंमलबजावणी करण्यासंदर्भात देखील शासन निर्णय सरकारने काढावा, असे जरांगे म्हणाले.

