भोपाळ : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी मध्यप्रदेशातील प्रसिद्ध आणि तितक्याच वादग्रस्त ‘बागेश्वर धाम’ला सहकुटुंब भेट दिली आहे. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गवई यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा ज्योतिरादित्य यांच्यासह बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आशीर्वाद घेतला.
गवई कुटुंबाने बागेश्वर धामवर विधिवत पूजन करून देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी धार्मिक आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली. गवई यांनी धामातील कॅन्सर रुग्णालय, गुरुकुल आणि संस्कृत शिक्षणाच्या उपक्रमांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
माजी सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेते आणि पुरोगामी कार्यकर्ते युवराज मोहिते यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की गवई ज्या सनातन संस्कृतीचे गोडवे गात आहेत, ती संस्कृती असती तर ते आज सरन्यायाधीश झाले नसते. त्यांना हे पद केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानामुळे मिळाले आहे. मोहिते यांनी पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, ज्या बाबासाहेबांच्या नावावर गवईंनी पदे उपभोगली, त्याच विचारांना तिलांजली देऊन ते एका ‘भोंदू’ बाबाच्या चरणी जात आहेत. बागेश्वर शास्त्रींच्या चमत्कारांचा अनेकदा पर्दाफाश झाला असतानाही एका सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने तिथे जाणे, हा संविधानाचा आणि आंबेडकरी चळवळीचा अपमान आहे.
विरोधाभास आणि चर्चा
एकीकडे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा तीव्र असताना, दुसरीकडे माजी सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे धार्मिक व्यासपीठावरून सनातन धर्माचे समर्थन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी माजी न्यायमूर्ती गवई यांची काय अधिकृत भूमिका असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

