Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक बोलवा

राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक बोलवा

बारामती : प्रतिनिधी
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

राष्ट्रीय हिताशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकत्रित चर्चा आणि व्यापक सल्लामसलत गरजेची असल्याचे सांगत पवार यांनी केंद्र सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. देशहिताच्या मुद्यांवर सामूहिक निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

शरद पवार यांनी पुढे अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञांची तातडीने बैठक घेण्याचीही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले. देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी मांडली.

सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे – बाळासाहेब थोरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काटकसरीचे आवाहन केले आहे याबद्दल अगोदरच राहुल गांधी यांनी सांगितले होते. निवडणुकीच्या काळात प्रचंड धुमाकूळ केला. प्रचंड इंधन वापरले आणि आता हे काटकसर सांगत आहेत. हे काही बरोबर नाही, सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR