जीनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकतीच डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या इबोला व्हायरसमुळे इंटरनॅशनल इमर्जन्सी ऑफ कन्सर्न म्हणजेच जागतिक पातळीवरील सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. हा आजार बुंडीबुग्यो व्हायरसमुळे पसरत असून तो इबोला व्हायरसचाच एक अत्यंत घातक स्ट्रेन आहे.
हा स्ट्रेन यापूर्वीच्या बहुतांश साथीच्या आजारांमध्ये पसरलेल्या झैरे स्ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. बुंडीबुग्यो स्ट्रेनचा शोध २००७-२००८ मध्ये युगांडातील बुंडीबुग्यो जिल्ह्यात लागला होता, जिथे तो पहिल्यांदा समोर आला. त्यावेळी या व्हायरसने ११६ हून अधिक लोकांना संक्रमित केलं होतं आणि सुमारे ३४ ते ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु यावेळी व्हायरसचा प्रकार वेगळा आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या स्ट्रेनवर कोणतीही विशेष लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही, ज्यामुळे हे आव्हान अधिकच कठीण झालं आहे.
व्हायरस अत्यंत धोकादायक
इबोला व्हायरसचे अनेक प्रकार आहेत, परंतु मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरणारे उद्रेक प्रामुख्याने तीन स्ट्रेनमुळे होतात – झैरे, सुदान आणि बुंडीबुग्यो. यापैकी झैरे स्ट्रेन सर्वात घातक मानला जातो, ज्यामध्ये मृत्यू दर ६० ते ९० टक्क्यांपर्यंत असू शकतो. त्या तुलनेत बुंडीबुग्यो स्ट्रेन कमी घातक आहे. पूर्वीच्या घटनांमध्ये याचा सरासरी मृत्यू दर ३२ ते ४० टक्के राहिला आहे, तर काही अहवालांमध्ये तो ५० टक्क्यांपर्यंतही सांगण्यात आला आहे. हा मृत्यू दर उपचारांची उपलब्धता, रुग्णाचे वय, आरोग्याची स्थिती आणि संसर्गाची तीव्रता यावर अवलंबून असतो. तरीदेखील हा व्हायरस अत्यंत धोकादायक आहे, कारण तो वेगाने पसरू शकतो आणि योग्य उपचारांशिवाय अनेकांचा जीव घेऊ शकतो.
बुंडीबुग्यो इबोलाची लक्षणे
इबोलाच्या सर्व स्ट्रेन्सची लक्षणे जवळपास सारखीच असतात, परंतु ती हळूहळू वाढतात. सुरुवातीची लक्षणे फ्लूसारखी (ताप आल्यासारखी) दिसतात जसे की अचानक खूप ताप येणे, डोकेदुखी, स्रायू आणि सांधेदुखी, थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. काही दिवसांनंतर उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि घशात खवखव होणं यासारख्या समस्या सुरू होतात. आजार अधिक वाढल्यास गंभीर लक्षणे दिसू लागतात. जसे की डोळे, हिरड्या किंवा शरीराच्या इतर भागांतून विनाकारण रक्तस्त्राव होणे, शरीरावर जखमांचे डाग पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अवयव निकामी होणे. संसर्ग झाल्यानंतर २ ते २१ दिवसांच्या आत ही लक्षणे दिसून येतात. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रव पदार्थांच्या (रक्त, उलटी, जुलाब, लाळ इत्यादी) थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो. मृत व्यक्तीच्या शरीराला स्पर्श केल्याने किंवा अन्त्यसंस्काराच्या विधी दरम्यान संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. हा आजार हवा, पाणी किंवा कीटकांमार्फत पसरत नाही.
















