लातूर (प्रतिनिधी): सहकारी साखर कारखानदारीत देशात आणि राज्यात आपला नावलौकिक जपणार्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर गळीत हंगाम २०२५-२६ चे अंतिम ऊस बिल जमा केले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रति मेट्रिक टन ३१७७.६२ रुपये प्रमाणे अंतिम बिल देण्यात आले असून, यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी चालू हंगामासाठी किमान ३१५० रुपये प्रति मॅट्रिक टन दर जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात जाहीर दरापेक्षा जास्तीचा म्हणजेच ३१७७.६२ रुपये प्रति मॅट्रिक टन इतका दर देऊन मांजरा परिवाराने आपली उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर एकूण २२७ कोटी ३२ लाख ९७ हजार ९४६ इतकी मोठी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
कारखान्याने यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना २८५० रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊसबील अदा केले होते. त्यानंतर आता उर्वरित ३२७.६२ रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे असणारी अंतिम रक्कम चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या आदेशाने १० जून २०२६ रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यंदाचा गळीत हंगाम दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला असून, कारखाना व्यवस्थापनाने सर्व संबंधित शेतकऱ्यांना आपल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
















