लंडन : इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादने स्वित्झर्लंडमध्ये इराण शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या हत्येचा कट रचला होता. हा दावा ब्राझीलचे पत्रकार पेपे एस्कोबार यांनी एका पॉडकास्टमध्ये केला आहे.
पत्रकारांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी अधिका-यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी धमकी दिली, त्यानंतर इस्त्रायलला आपली योजना बदलावी लागली. हा दावा त्यावेळचा आहे जेव्हा पाकिस्तान आणि कतारचे शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये उपस्थित होते. तेव्हाच इराण आणि अमेरिकेदरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली होती.
पॉडकास्ट दरम्यान राजकीय भाष्यकार मारियो नॉफलच्या पॉडकास्टमध्ये एस्कोबारने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याला अत्यंत विश्वसनीय माहिती मिळाली होती की, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या आदेशानुसार मोसाद हल्ला करण्याची तयारी करत आहे. एस्कोबारने दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत इस्त्रायलला स्थान मिळाले नाही, त्यामुळे तो या प्रक्रियेवर खूश नव्हता. त्यांचे असेही म्हणणे आहे की, लेबनॉनमधील इस्त्रायलच्या लष्करी मोहिमेने शांतता कराराचा मार्ग आणखी कठीण केला आहे.
पाकने इस्त्रायलला धमकीचा संदेश पाठवला
एस्कोबारने पुढे सांगितले की, या कटाची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने इस्रायलला इशाराही पाठवला होता. त्यांच्या मते, हा संदेश कदाचित ओमानमार्फत पोहोचवण्यात आला होता. यात पाकिस्तानने म्हटले होते की, जर पाकिस्तानी शिष्टमंडळाला काही झाले, तर इस्रायलला नकाशावरून मिटवून टाकले जाईल. मात्र, हा दावा समोर येताच पाकिस्तानने तो फेटाळून लावला.
















