रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी राजवट आणि सैन्याविरोधात जनतेचा आक्रोश पाहायला मिळत आहे. याठिकाणी एकीकडे रावलकोटच्या ईदगाह मैदानात ५० हजाराहून अधिक आंदोलक पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पीओकेतील महिला आंदोलक पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी भारताची हात मिळवणी करण्याचे आवाहन करत आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रनिमा शझमाने एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, ज्या प्रकारे पाकिस्तानी सैन्य घरे लुटत आहे आणि लोकांना लक्ष्य करत आहे, ते पाहता पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी भारतासोबत हातमिळवणी करणेच अधिक चांगले होईल. पाकिस्तान कधीही पाकव्याप्त काश्मीरच्या सोबत नव्हता आणि कधीही असणार नाही असे रनिमा शझमा यांनी स्पष्ट सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक पाकिस्तानी नियंत्रणाविरोधात आपला आवाज उठवत आहेत.
आवामी अॅक्शन कमिटीचे सदस्य सरदार अमन खान यांनी ५०,००० आंदोलकांसमोर सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने काश्मीर सोडून जावे कारण ते काश्मीरसाठी काहीही करू शकत नाहीत. काश्मीर काश्मिरींना द्या आणि मग काश्मीर आणि भारत पाहून घेईल. पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांना पाकिस्तानी सरकार आणि आयएसआयने निर्वासितांच्या जागांवर नेमलेले १२ आमदार नको आहेत आणि निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेले उर्वरित ४१ आमदारही नको आहेत असे त्यांनी म्हटले.
पाक सरकार आणि सैन्याचे किळसवाणे कृत्य
पीओकेमधील आंदोलने संपवण्यासाठी पाकिस्तानी सरकार आणि सैन्य काश्मीरात अन्नटंचाई निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान-पाकव्याप्त काश्मीर सीमेवर १० दिवसांपासून अन्नधान्य घेऊन जाणारे ट्रक उभे असल्याचे फोटो समोर आले आहेत. ही वाहने पाकिस्तानी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखत आहे.
पाकव्याप्त काश्मीर १६ दिवसांपासून पूर्णपणे बंद
गेल्या १६ दिवसांपासून संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर बंद असून लोकांनी आपली घरे सोडून रावलकोटमध्ये आंदोलने सुरू केली आहेत. पाकिस्तानी सरकार बंडखोरी दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या बाहुली सरकारने बंडखोरीत सहभागी झाल्याबद्दल १२८ सरकारी कर्मचा-यांना त्यांच्या नोकरीतून बडतर्फ केले. या आंदोलनात आतापर्यंत ५८ लोक मृत्यूमुखी पडलेत. १५० हून अधिक लोकांना पाकिस्तानी सैन्याने दहशतवादी घोषित केले आहे.
















