अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरी प्रकरणात अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून अयोध्या पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. एसआयटीच्या (विशेष तपास पथक) तपास अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी सर्व आरोपींच्या घरावर छापे टाकत त्यांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव आणि इतर काही जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०६, ३१६ (५), ३१७ (४), ६१ आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून मोठी कारवाई; बड्या नावांचा समावेश नाही
या कारवाईत चंपत राय किंवा अनिल मिश्रा यांसारख्या ट्रस्टच्या बड्या पदाधिकाऱ्यांची नावे नाहीत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राम मंदिरातील दानपेटीची रोकड मोजणाऱ्या ६ मुख्य कॅशियर्सचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे लोक प्रत्यक्ष चोरी करताना दिसले किंवा ज्यांनी या चोरीत मदत केली, त्यांच्यावरच पोलिसांनी कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे.
कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न; ट्रस्टची कठोर भूमिका
या प्रकरणाकडे सुरुवातीला केवळ अंतर्गत गैरव्यवहार किंवा विभागीय तपासाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. मात्र, आता थेट एफआयआर दाखल झाल्याने याला मोठे कायदेशीर स्वरूप आले आहे. हे प्रकरण केवळ पैशांच्या अपहारापुरते मर्यादित नसून, देश-विदेशातील कोट्यवधी हिंदू भाविकांनी रामलल्लाच्या चरणी अर्पण केलेल्या अथांग श्रद्धेशी आणि विश्वासाशी जोडलेले आहे. त्यामुळे राम जन्मभूमी ट्रस्टने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये या चोरीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. काही धक्कादायक पुरावे आणि कागदपत्रेही समोर आली होती, ज्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ट्रस्टने स्वतःहून पुढाकार घेत एफआयआर दाखल केला आणि रामलल्लाचा खजिना तसेच श्रद्धाळूंच्या आस्थेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
आतील लोकांचा सहभाग? तपासाकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणात प्रत्यक्ष एफआयआर दाखल झाल्यानंतर आता हा तपास आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मंदिरातील अंतर्गत व्यवस्थेच्या आणि ‘आतील’ लोकांच्या मदतीशिवाय एवढी मोठी चोरी होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. सध्या एसआयटी आणि पोलिसांकडून या प्रकरणाची संयुक्त चौकशी सुरू असून, लवकरच यामागील मोठ्या कटाचा पर्दाफाश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
















