बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या घरात पुन्हा सनई-चौघडे वाजणार आहेत. सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार असल्याची बातमी आहे. कायनात धार यांच्याशी पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. कायनात धार आणि पार्थ पवार हे दोघेही सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीच्या लग्नात एकत्र दिसले होते. कायनात धार या मूळच्या काश्मीरमधील असून सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा २९ जुलैला पुण्यात होणार असल्याची माहिती आहे.
कायनात धार फक्त सुखाच्या क्षणातच नाही, तर दु:खद प्रसंगातही पार्थ पवार यांच्यासोबत उभ्या होत्या. अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी बारामतीत येऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केले होते. त्याशिवाय वरळी येथे आयोजित शोकसभेला सुद्धा त्या उपस्थित होत्या. कायनात धार या मूळच्या हरियाणाच्या आहेत. त्यांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मध्यंतरी कायनात धार आणि पार्थ पवार उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र पूजा करताना दिसले होते.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर पार्थ पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. मध्यंतरी पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले होते. सध्या दिल्लीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीची जबाबदारी संभाळत आहेत. अजित पवार यांचे जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला विमान अपघातात निधन झाले. बारामती एअरपोर्टजवळ त्यांचे विमान कोसळले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसची कमान आली. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. त्यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे अजितदादांच्या हयातीत परदेशात लग्न झाले आहे. जय पवार सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत.
















