कल्याण : प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण केवळ एका रागाचा उद्रेक नव्हता, तर या प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी पाहिल्यास ही एक सराईत गुन्हेगारी वृत्ती असल्याचे समोर येत आहे. रुग्णालयात घुसून डॉक्टरांवर हात उचलणा-या नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांच्या गुन्हेगारी कुंडलीमुळे आता शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी धक्कादायक असून, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवलीतील या मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कल्याण-डोंबिवलीसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. केवळ सामान्य नागरिकच नाही, तर राजकीय नेत्यांनाही धमकावण्यापासून ते सरकारी अधिका-यांवर दबाव आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. रमेश म्हात्रे यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी आणि धमकी देणे असे विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
रमेश म्हात्रे नेहमी वादाच्या भोव-यात
त्यांच्या गुन्हेगारी इतिहासातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे २००५ मध्ये तत्कालीन शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय तत्कालीन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना जीवे मारण्याची धमकी देणे आणि तत्कालीन पालिका आयुक्त वेलरासू यांना धमकावणे अशा घटनांमुळे म्हात्रे नेहमीच वादाच्या भोव-यात राहिले आहेत. महापालिका सभागृहात दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यात झालेला वाद आणि त्यानंतर झालेली धक्काबुक्की हेदेखील त्यांच्या आक्रमक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदाहरण मानले जाते.
टोळीतील प्रत्येकजण गुन्हेगारी विश्वाशी संबंधित
रमेश म्हात्रे यांच्यासोबत या मारहाण प्रकरणात जे इतर तीन आरोपी अटक झाले आहेत, त्यांची पार्श्वभूमीही तितकीच गंभीर आहे. या टोळीतील प्रत्येक सदस्य गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अक्षय करांडे याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत, याशिवाय त्याच्यावर मारामारीचे इतरही काही गुन्हे नोंद आहेत. प्रमोद निकम याच्यावर सातारा जिल्ह्यात खुनाचा म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. तर रमेश पवार याच्यावर महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.
















