पुणे : प्रतिनिधी
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पुण्यातील भवानी पेठेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला भेट देत माऊलींच्या पवित्र चलपादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेला सलाम करत, वारीतील प्रत्येक भाविकाच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी राज्य प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माऊलींचे दर्शन झाल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पदाधिका-यांनी त्यांचा सत्कार करून माऊलींची प्रतिमा आणि प्रसाद भेट दिला. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालखी तळावर वारक-यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा वारीपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, संकटांवर मात करत विठ्ठल दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. हीच वारकरी संप्रदायाची खरी ताकद आणि परंपरेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
वारीत यंदा मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याने शासनाने विशेष तयारी केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्यांची दुरुस्ती, फिरती आरोग्य सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती दिली. वारकरी मार्गावर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारक-यांची सेवा हीच शासनाची जबाबदारी आहे. वारीचा प्रत्येक टप्पा सुरक्षित, सुकर आणि आनंददायी व्हावा यासाठी प्रशासन चोवीस तास सज्ज आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान भवानी पेठ परिसरात ‘माऊली-माऊली’च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. लाखो वारक-यांच्या भक्तिभावाने आणि उत्साहाने आषाढी वारीचा सोहळा अधिकच मंगलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
















