लातूर : लातूर शहरातील नामांकित हृदयरोगतज्ज्ञ तथा एम. जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तपासातून महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण मराठवाडा हादरला असताना, पोलिसांनी प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नसून आत्महत्येची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल आणि सखोल तपासानंतरच काढण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) समीरसिंह साळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळावरील प्राथमिक पुरावे आणि तपासातून डॉ. राठोड यांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचे इंजेक्शन घेतल्याची शक्यता दिसून येत आहे. तथापि, कोणताही निष्कर्ष घाईने काढला जाणार नाही. शवविच्छेदन अहवाल, रासायनिक विश्लेषण आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मोबाईलमध्ये दडले आहे उत्तर?
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावर किंवा कारमधून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे तपासाचा केंद्रबिंदू आता डॉ. राठोड यांचा मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, संदेश आणि डिजिटल माहितीवर आहे. मोबाईलमधील डेटा तपासून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सकाळी घरातून बाहेर, संध्याकाळी कारमध्ये बेशुद्ध
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. मेहुल राठोड घरातून स्वतःच्या इनोव्हा कारने बाहेर पडले. त्यांच्या पत्नी डॉ. प्रियांका राठोड नेहमीप्रमाणे रुग्णालयात गेल्या होत्या. दुपारनंतर डॉ. राठोड यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांची कार अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेज परिसरात उभी असल्याचे समोर आले. तेथे पोहोचल्यावर ते कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कारमधून सापडल्या रिकाम्या औषधाच्या बाटल्या
घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना कारमध्ये भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या काही रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय अधिक बळावला आहे. या सर्व वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आल्या असून त्यांचा वैज्ञानिक अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद; सर्व बाजूंनी तपास
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक तसेच मानसिक तणावाच्या सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही ठोस कारण सांगणे योग्य ठरणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. मेहुल राठोड यांच्या निधनामुळे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, रुग्ण, सहकारी डॉक्टर आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. दरम्यान, या हायप्रोफाइल प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
















