मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेली ४८ हजार कोटींची वीजबिल माफी ही शेतक-यांच्या हितासाठी नसून उद्योगपती गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्य वीज मंडळाच्या चारही कंपन्यांचे खासगीकरण करून त्या कंपन्या अदानीला आंदण द्यायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात बोलताना शेतक-यांचे थकीत ४८ हजार कोटींचे वीजबिल माफ करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेचा सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना समाचार घेतला. सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी तिची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर वीजबिल माफीची घोषणा करण्यात आली असली तरी ती दिशाभूल करणारी आहे. ही योजना शेतक-यांसाठी नसून वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाचा भाग आहे. एमएसईबीच्या चारही कंपन्या खासगी हातात देऊन त्याचा लाभ अदानी समूहाला मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर टीका करताना सपकाळ म्हणाले की हे विधेयक देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी अशी व्यवस्था निर्माण करायची असून या विधेयकाद्वारे उत्तर आणि दक्षिण भारतात राजकीय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने कायम ठेवली असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली छात्रों की गुंज अभियान सुरू आहे. या अभियानाचा पुढील कार्यक्रम १७ जुलै रोजी डेहराडून येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
















