मुंबई : प्रतिनिधी
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील अन्त्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सुरु केलेली मोफत साडीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाळली आहे. वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजना, विविध घटकांना दिले जाणारे अर्थसहाय्य, प्रस्तावित योजनांचा आर्थिक भार आणि इतर दायित्वे यांचा विचार करता कॅप्टिव्ह मार्केट योजना पुढील आर्थिक वर्षात सुरु ठेवणे संयुक्तिक दिसत नसल्याने मोफत साडीची योजना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, वयोश्री, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन, शेतक-यांसाठी एक रुपयात पीक विमा अशा अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजना एकापाठोपाठ बंद केल्या. आता अन्त्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी देण्याची योजनाही बासनात गुंडाळण्यात आली आहे.
वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२३ रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार राज्यातील अन्त्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरु करण्यात आली. योजनेच्या अंतर्गत राज्य यंत्रमाग महामंडळाने १ साडी ३५५ रुपयांना खरेदी केली. तसेच या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहीरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आला. ही योजना २०२३ ते २०२८ अशा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, योजेनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ती बंद करण्यात आली.
















