मुंबई : प्रतिनिधी
देशभरातील तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणा-या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि निष्ठूर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या १९ जुलैला शिवाजी पार्क मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन उद्धव ठाकरे गटाने केले आहे.
नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांची व पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसह तरुणांच्या विविध मागण्यांसाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या १८ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृतीही खालावली आहे. केंद्र सरकारने मात्र अजूनही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून २० जुलैला दिल्लीमध्ये जंतर मंतरपासून संसद भवनावर निघणा-या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी १९ जुलैला शिवाजी पार्क येथे (शिवतीर्थ) माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. संध्याकाळी ४ वाजता भेटूया. हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही. त्यामुळे सगळ्यांनी जमुया आणि देशाच्या तरुणांचा आवाज बनूया, असे आवाहन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाज माध्यमातून केले.
राज ठाकरेंचाही सोनम वांगचूक यांना पाठिंबा
नीट पेपरफुटीसंदर्भात कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या सोनम वांगचूक यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंर्त्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेचा पाठीशी आहोत आणि कायम असू देखील असे राज ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयी जरा लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यांत काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबुज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांच्या सत्तेचा डोलारा टिकला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी लक्ष घालावे
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आताच घडले आहे असे नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत आणि हा विषय राजकीय नाही आहे. हा विषय सामाजिक आहे.
















