लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा (एएचटीयु) ने केलेल्या धडक कारवाईत स्पा सेंटरच्या आड सुरू असलेले देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक ताब्यात घेण्यात आला असून मालकासह दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
दि. २० जुलै रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस अमलदार लता गिरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंत्री प्लाझा कॉम्प्लेक्स, औसा रिंग रोड, लातूर येथील ‘नाईस स्पा’ या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरील जिल्हा व राज्यातून महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. ही माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात सदर ठिकाणी छापा टाकून स्पा सेंटरच्या आड सुरू असलेले देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले आहे.
तपासामध्ये स्पा सेंटरच्या माध्यमातून बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत पुरुष ग्राहकांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये कलम १४३(३)(५) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनैतिक व्यवसाय (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आदित्य जगन रसाळ यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन रावसाहेब काळुंके याचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला शासकीय महिला निवारा ग्रह लातूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील आदेशासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, महिला पोलीस अमलदार लता गिरी, सुधानती वंगे, पोलीस अंमलदार सदानंद योगी, सचिन मुंडे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे हे करीत आहेत.
















