मुंबई : राज्यात सलग आठव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत. नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली येथे अडान नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रवाहात इर्टिगा कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्या असून, पतीने झाडाचा आधार घेत थरारक बचाव केला. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यामध्ये गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात प्रथमच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. २०२२ ते २०२५ या ४ वर्षांत जून, जुलै मिळून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा पहिल्या २ महिन्यात सरासरी ५२७.८ मिमीच्या तुलनेत ५०८.७ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९६.४ टक्के आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही २ महिन्यात गेल्या ५ वर्षात दुस-यांदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात ८१.१ टक्के पाऊस झाला. २०२५ मध्ये ९२.२ टक्के पाऊस पडला होता. त्यापूर्वीच्या ३ वर्षांत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.
जायकवाडीत ७२ टक्के जलसाठा
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ५७ हजार ४६३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. यामुळे धरणाचा उपयुक्त जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला असून, मराठवाड्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात ४ गावांचा संपर्क तुटला
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सलगपावसामुळे पैनगंगा नदीसह परिसरातील सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे पांगरपहाड, आंदबोरी, रेवानाईक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. शेतात व पिकांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत देखील पावसाने हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात १४ मिमी
परभणीजिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी पावसाची नोंद १४.१मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २७.४ मिमी पाऊस झाला. सेलू तालुक्यात सर्वात कमी ७ मिमी पावसाची नोंद झाली.तालुकानिहाय झालेल्या पावसामध्ये गंगाखेड येथे १६.७ मिमी, जिंतूर येथे १६.३ मिमी, पालम येथे १४.६ मिमी, परभणी येथे १२.६ मिमी, सोनपेठ येथे १२.५ मिमी, मानवत येथे ८.८ मिमी आणि पाथरी येथे ८.१ मिमी पाऊस झाला.
धाराशिवात सुर्यदर्शन नाही
धाराशिव जिल्ह्यात शहरासह आठही तालुक्यांत दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. आकाशात दाट ढगांची गर्दी होती. दिवसभर पाऊस सुरू होता. यामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले.
जालन्यात शेकडो घरांत पाणी शिरले
जालना शहरातील नवीन मोंढ्याजवळील मोठा नाला दोन वर्षांपासून फुटलेला आहे. त्यामुळे पाऊस आला की गायत्री नगरच्या घरांमध्ये पाणी घुसते. नागरिकांनी आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे यांची भेट घेतली. परंतु तीन हप्ते उलटूनही ना अधिकारी आला, ना आयुक्त, ना महापौर. गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना अडणीचा सामना करावा लागला.
















