लातूर : प्रतिनिधी
अण्णा भाऊंनी आपल्या समृद्ध अनुभवांच्या आणि अलौकिक प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. म्हणूनच ‘लेखन प्रेरणा दिन’ हा केवळ लेखनाचा उत्सव न राहता वंचितांच्या जीवनाचे वास्तव समजून घेण्याचा, सामाजिक प्रश्नांवर संवेदनशीलपणे लिहिण्याचा आणि परिवर्तनवादी साहित्यनिर्मितीची प्रेरणा घेण्याचा दिवस ठरावा. त्यांच्या साहित्याचे वाचन, चिंतन आणि अनुकरण करून नव्या पिढीने लेखनाची प्रेरणा घ्यावी आणि आपल्या लेखणीतून सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे न्यावा, हाच या दिवसाचा खरा हेतू आहे.
दयानंद शिक्षण संस्थेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. ननवरे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित आणि कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर व साहित्यावर सविस्तर प्रकाश टाकत अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. त्यांनी कथा, कादंब-या, कविता, प्रवासवर्णने, छक्कड, पोवाडे आणि नाटके यांसारख्या विविध प्रकारांतून समृद्ध लेखन केले.
गावकुसाबाहेरील शोषित, पीडित समाजाचे दु:खाश्रू आणि त्यांच्यावर होणा-या अन्यायाला आपल्या साहित्यातून वाचा फोडण्याचे महान कार्य केल्याचे सांगून प्रा. ननवरे म्हणाले की, स्त्रियांवर होणा-या अन्यायाविरुद्धही अण्णा भाऊंनी अत्यंत प्रभावी लेखन केले असून, त्यांच्या कादंब-यांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या साहित्यातील स्त्री ही परिस्थितीनुसार नाजूक असण्यासोबतच कणखर आणि संघर्षशील दिसते, तर त्यांचा नायक समाजात होणा-या अन्यायाविरुद्ध त्वेषाने प्रहार करणारा बलदंड पुरुष आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपल्या शाहिरी काव्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. या सोहळ्यास दयानंद कला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, दयानंद शिक्षण संस्थेतील व महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















