जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे तालुका होऊन २७ वर्षे झाले तरी शासनाच्या वतीने बस डेपो मंजूर करण्यात आला नाही. तालुका निर्मितीपासून जळकोट येथे बस डेपो मंजूर करावा अशी मागणी जळकोट तालुक्यातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.जळकोट येथील बस डेपोचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव पाठवून अनेक वर्षाचा कालावधी झाला तरीही अद्यापही या बस डेपोचे भिजत घोंगडे आहेत. जळकोट येथील बस डेपोच्या प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला नाही. यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे .
जळकोट येथे तालुका निर्मितीनंतर अद्यापही बस डेपो झाला नाही यामुळे जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना तालुका निर्मितीनंतरही तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच जळकोट तालुका झाला तरी जळकोट तालुक्यातील नागरिकांना उदगीर किंवा अहमदपूर येथील आगारावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे तालुक्यासाठी अतिशय कमी प्रमाणात बसेस उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची कुचंबना होत आहे .
जळकोट येथून नांदेड अथवा लातूर येथे जाण्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध होत नाही यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांना उदगीर येथील आगारावर अवलंबून राहावे लागत आहे. जळकोट तालुक्यातील कधी बस सुरू करायची आणि कधी बस बंद करायची हे येथील आगार प्रमुखावरच अवलंबून राहत आहे यामुळे मध्यंतरीच लांब पल्ल्याच्या बस सेवा बंद होत आहेत. जळकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे तसेच जळकोट या तालुक्याच्या ठिकाणाहून जवळपास ३० ते ४० किलोमीटर कुठलाच आधार नाही तसेच हा डोंगराळ भाग असून हा भाग तेलंगाना तसेच आंध्र या भागाशी जोडला आहे. या गावातील नित्य शंभर गावाचा संपर्क असतो यामुळे जळकोट तालुक्याच्या ठिकाणी बस आगार होणे गरजेचे आहे. जळकोट येथे बस डेपो मंजूर करावा अशी मागणी जळकोट तालुका विकास संघर्ष समिती तसेच पत्रकारांच्या वतीने करण्यात आली तसेच जळकोट येथे बस डेपो मंजूर करावा या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले होते. यावेळीही लवकर बस डेपो करू असे आश्वासन देण्यात आले . मात्र बस डेपो संदर्भात कुठलीच हालचाल दिसून येत नाही.
















