पुणे : प्रतिनिधी
शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा धोका वाढला आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे तब्बल ६७१ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलैमध्येच सर्वाधिक ३२३ संशयित आणि १२ बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, चिकुनगुनियाचे सात, तर मलेरियाचा एक रुग्ण आढळला आहे. या आजारांमुळे अद्याप शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार, २६ जुलै ते १ ऑगस्ट या काळात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वेगाने भर पडली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण (एनएस१) सापडले आहेत. त्यापैकी २७ रुग्णांच्या एनआयव्ही चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.
शहरातील विविध भागांत घरांच्या गच्चीवर, फुलझाडांच्या कुंड्या, टायर तसेच बांधकामांच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकांकडून डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी नियमित तपासणी आणि अबेटिंगची कारवाई सुरू आहे.
सात महिन्यांत तपासले २१ लाख कंटेनर
जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत कीटक प्रतिबंधक विभागाने २१,०३,३०४ कंटेनरची तपासणी केली. त्यापैकी १२,९८४ कंटेनर डास उत्पत्तीसाठी धोकादायक आढळले. या कालावधीत ८,५७० दूषित घरे आढळून आली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या काळात १०,०३,३६८ खासगी व सार्वजनिक मिळकतींमध्ये अबेटिंग करण्यात आले. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबरोबरच धूरफवारणी आणि औषध फवारणीही करण्यात आली.
जुलैमध्ये सर्वाधिक ३,६७,८१४ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २,२९४ कंटेनर दूषित आढळले. या महिन्यात १,७६,०८९ मिळकतींमध्ये अबेटिंग, तर ३१,५३६ घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. नियमभंगप्रकरणी ५२४ नोटिसा बजावून १,२२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईचा धडाका
डासांची उत्पत्तीस्थळे आढळलेल्या ठिकाणी महापालिकेने कारवाई करून प्रशासकीय शुल्क व दंडाच्या माध्यमातून ३,३५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे. कीटकशास्त्रीय निर्देशांकातही जुलैमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने पावसाळ्यात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे.
नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा
घराच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणी साचणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. पाण्याच्या टाक्या, भांडी आणि अन्य पाणी साठविणारी पात्रे झाकून ठेवावीत. आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने केले आहे.
















