मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भल्या सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ दिला. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे राज्य सरकारवर अत्यंत आक्रमकपणे टीका करत असतानाच ही सरप्राइज भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली किंवा ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांत राज ठाकरे यांनी सरकारवर अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे, जेन-जी आंदोलन आणि नाशिक दौ-यादरम्यान कुंभमेळ्याच्या नियोजनावरून ठाकरेंनी सरकारवर थेट निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, महामार्ग आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर मख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी राज ठाकरे भेटायला गेल्याचा एक तर्क लावला जात आहे.
अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीने नवी चर्चा
या भेटीदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क मैदानाच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे नवीन स्टेडियम उभारणीबाबत किंवा शिवाजी पार्क मैदानाच्या विकासाबाबत कोणताही विशेष प्लॅन घेऊन ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे गेले होते का? अशीही चर्चा रंगू लागली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून, लवकरच या भेटीचे मुख्य कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
















