नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीरचक्र पुरस्कार विजेते अभिनंदन वर्धमान यांनी आता खासगी व्यावसायिक विमानसेवेत प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई संघर्षादरम्यान पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्यानंतर आणि पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर देशभर चर्चेत आलेले वर्धमान हे गोव्यातील प्रादेशिक विमान कंपनी एफएलवाय९१ मध्ये पायलट म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी ऑगस्ट महिन्यात कंपनीत प्रवेश केला.
अभिनंदन वर्धमान यांची भारतीय हवाई दलातील कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. विशेषत: २०१९ मध्ये भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर दुस-याच दिवशी झालेल्या हवाई संघर्षातील त्यांच्या भूमिकेमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला होता. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर भारताने बालाकोटमध्ये कारवाई केली.
















