मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून डीजे बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. दुसरीकडे, तरुणांमध्ये डीजेची मोठी क्रेझ असून उत्सव जल्लोषात साजरे करण्यासाठी मोठ्या आवाजातील गाण्यांना पसंती दिली जाते. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी केल्यानंतर या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आता अभिनेता श्रेयस तळपदेनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच श्रेयसने मराठी भाषा, गरबा-दांडियातील मुस्लिमांच्या प्रवेशाचा मुद्दा आणि हनुमान अंशच्या यशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रेयस तळपदे म्हणाला, सण साजरे करायलाच पाहिजेत; पण लोकांना त्रास होऊ नये. सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या सणांचे वेगळे वैशिष्टय आणि गांभीर्य आहे. ते समजून घेत लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सण साजरे केले पाहिजेत.
महाराष्ट्रात मराठी बोलायला काय प्रॉब्लेम?
दरम्यान, मराठी भाषा सक्तीच्या मुद्यावरही श्रेयसने आपलं मत मांडलं. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बोलण्याबाबत कोणतीही अडचण नसावी, असं त्याने सांगितले. मुंबईच नाही तर महाराष्ट्रात मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे? मी अजून कुठे गेलो, तर तिथली भाषा शिकतो. मी इकबालच्या शूटिंगदरम्यान हैदराबादला गेलो होतो, तेव्हा थोडी-थोडी तेलुगू शिकलो होतो. आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, तिथली भाषा शिकायला काय हरकत आहे? असे श्रेयस म्हणाला.
















