मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडले असून, गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तिस-यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता ३ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर खेळ असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २५ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अचानक थेट ३ जानेवारीवर ढकलण्यात आली आहे. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना असा निर्णय घेणे म्हणजे रात्रंदिवस तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, स्वप्नांशी आणि भविष्याशी चालवलेला क्रूर खेळ आहे. केंद्रांची अनुपलब्धता, वाहतुकीच्या अडचणी आणि सणासुदीचा काळ ही काय कारणे आहेत? वेळापत्रक जाहीर करताना याचे नियोजन केले नव्हते का? अचानक घेतलेल्या संशयास्पद निर्णयामागे या परीक्षेतही काहीतरी मोठा घोळ शिजतोय का, असा संशय निर्माण होत आहे!
भविष्याचा बाजार मांडला : वडेट्टीवार
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणा-या हा कारभार चुकीचा आहे. एमपीएससीच्या बेजबाबदार नियोजनाचा फटका नेहमी गरीब शेतक-यांच्या आणि कष्टक-यांच्या मुलांनीच का सहन करायचा? हा लाखो होतकरू तरुणांच्या संयमाचा अंत आहे. विद्यार्थ्यांचा हा वाढता संताप या संवेदनाहीन सरकारला आणि आयोगाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
एमपीएससीचेच पेपर का फुटतात? : सुळे
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देशात आयआयटी आणि आयआयएमच्या परीक्षा होतात, तिथले पेपर का फुटत नाहीत? मग आपल्या एमपीएससी परीक्षांमध्येच हे घोटाळे का होतात? पेपर फुटण्यामागचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकरी जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करू शकत असेल, तर परीक्षा यंत्रणेत या तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
परीक्षेच्या तारखेत बदल का?
आयोगाचे उपसचिव विवेक देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, परीक्षा प्रशासकीयदृष्टया सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यात विविध जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि स्थानिक प्रशासनाचे अहवाल. सणासुदीचा काळ, संभाव्य वाहतूक कोंडी आणि उमेदवारांचा प्रवास. राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आदींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचा विरोध
यापूर्वी ही परीक्षा १२ जुलै, २७ सप्टेंबर आणि २५ ऑक्टोबर अशा ३ वेगवेगळ्या तारखांना नियोजित करण्यात आली होती. वास्तविक पाहता, २०२६ च्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता पूर्व परीक्षाच २०२७ मध्ये जात असल्याने संपूर्ण प्रक्रिया आणखी लांबणार आहे. वारंवार होणा-या या बदलांमुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे.
















