मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा मोर्चा धडक देण्याची घोषणा आज आंतरवाली सराटीतून केली आहे. १२ तारखेला याविषयीचे जाहीर घोषणा ते करणार आहेत. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून आमचे सहकारी याप्रकरणात लक्ष घालत आहेत. त्यांचा अंतिम अहवाल समोर आला, तेव्हा निर्णय घेऊ, असे विखे म्हणाले. जे नेते आतापर्यंत मराठा समाजाची बाजू घेऊन बोलत होते, ते आता पक्षाची बाजू घेऊन बोलत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर बोलताना, त्या वादात आता पडण्याचे कारण नाही. ज्या मागण्या समोर आल्या आहेत. त्याची परिपूर्ति करण्याचे काम सरकार करत आहे. आणखीही त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार निश्चितपणे त्याचा विचार करेल, असे विखे यांनी स्पष्ट केले.
मराठा मोर्चा मुंबईत धडकणारच : जरांगे
मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणारच असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर केले. आंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना त्यांनी १२ सप्टेंबर रोजी होणा-या बैठकीचा उल्लेख केला. त्यानंतर मुंबईत जाण्याची तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर सरकारमधून सावध प्रतिक्रिया आली आहे. मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एसईबीसीचा लाभ मिळतोय
एसईबीसीचे जे आरक्षण दिलेले आहे. त्यातील १० टक्के आरक्षणाचा विशेषत: मराठा मुलांना मोठा फायदा होत आहे. एसईबीसीला कोणत्या न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी आपण विशेष लक्ष घातलं आहे. एसईबीसीचे आरक्षणाचा समाजातील मुलांना मोठा फायदा होईल. अशी वस्तुस्थिती नाही की, त्याचा लाभ कुणालाच मिळत नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
















