मुंबई : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी विरोधी पक्षांनी देशभरात आंदोलन सुरू केलेले असताना कॉक्रोच जनता पार्टीनेही २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी तेथेच आंदोलन करण्यावर सीजेपी नेते अभिजित दिपके ठाम आहेत. दिल्लीत अमित शहांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पक्षपाती भूमिका व एसआयआर च्या माध्यमातून मतदारयादीतील लाखो नावे वगळण्याच्या षडयंत्राविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने दादर येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २ ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनालाुविरोध केला आहे. मात्र कॉक्रोच जनता पार्टी तेथेच व आंदोलन करण्यावर ठाम आहे.
पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी तेथेच सीजेपी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. ब्रिटिशांनी गांधीजींच्या आंदोलनाला परवानगी दिली नसती, तरीही त्यांनी लढा दिला. शिवाजी पार्कवर फडणवीस रॅली काढू शकतात, मग आम्हाला तिथे आंदोलन करायला परवानगी का नाही? मला ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये ठेवा, मी बाहेर येऊन पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, असा इशारा त्यांनी दिला.
ज्या यंत्रणेवर देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे, तीच यंत्रणा एका पक्षाची हस्तक झाली आहे. मतदार यादीत कोण राहणार हे सरकार ठरवत आहे. निवडणूक आयोग सरकारच्या प्रभावाखाली काम करत आहे. २०२४ पासून मतदार यादीतून सुमारे १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी कॉक्रोच जनता पार्टी मुंबईतून आंदोलन सुरु करत आहे. देशभरात विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.
दिल्लीतील जंतर मंतरवर देखील हे आंदोलन होणार असून,जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे दिपके यांनी सांगितले. २०२९ च्या निवडणुकीत ‘जेन झी’ मतदारांची संख्या सर्वाधिक असणार आहे. त्यांना कसा देश हवा आहे, तसा तो देणे आपली जबाबदारी आहे. लोकशाहीत जनता सरकार ठरवते, पण आता सरकारच आपले मतदार कोण असावेत हे ठरवत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार असून, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचे पपेट आहेत, अशी टीका अभिजित दीपके यांनी केला.
२०२५ ची एसआयआर यादी गोठवा
२०२५ ची जी एसआयआर यादी आहे ती तत्काळ गोठवण्यात यावी. २००५ च्या मतदार यादीच्या आधारेच पुढील निवडणुका घेण्यात याव्यात. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती ही पूर्णपणे पारदर्शक पाहिजे. तसेच २०२३ पासून वगळण्यात आलेल्या सुमारे १३ कोटी मतदारांच्या हक्कासाठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिपके यांनी दिला.
शिवाजी पार्क मैदानावर प्रचंड पोलिस बंदोबस्त!
सीजेपीच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनी शिवाजी पार्क मैदानावर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांनी मैदानाभोवती कडे केले आहे. सीजीपीच्या कार्यकर्त्यांकडून दोन वेळा मैदानाची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांची व स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाची झाल. त्यामुळे वातावरण तापले आहे.
















