लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील उपलब्ध पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पुढील नियोजन करण्यासाठी लातूर शहरातील ११ जलकुंभांची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व महानगरपालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून भेट देवून पाहणी केली.
सदरील पाहणीमध्ये प्रत्येक जलकुंभ ठिकाणचे दैनंदिन व्यवस्थापन, तेथील कर्मचारी वर्ग, येत असलेल्या अडीअडचणींबाबत पाहणी करण्यात आली. तसेच संबंधित जलकुंभावरुण त्या त्या भागात वेळेवर पाणी पुरवठा होत असल्याची खात्री करण्यात आली. पाणीपुरवठा सुरू असलेल्या प्रभागामध्ये, प्रत्यक्ष भेटी देवून नळाला स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याबद्दल, नळाला येत असलेले पाणी पिऊन खात्री केली. जलकुंभावरुन पाणी सोडलेल्या विविध प्रभागात भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. जे नागरिक विनाकारण पाणी वाया घालत होते, रस्त्यावर पाणी सोडणे किंवा वाहणे धुवून पाणी वाया घालत होते त्यांना पाण्याची बचत करावी व विनाकारण पाणी वाया घालवू नये, असे आवाहन करण्यात आले. सदरील पाहणीमध्ये कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर, कनिष्ठ अभियंता क्षितिज कटके, प्रविण चव्हाण, जलकुंभ प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
















