लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात दरवर्षी सर्वाधिक भाव देण्याची परंपरा मांजरा साखर परिवाराने जपली आहे. कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, उस तोड वाहतूकदार या सर्वांत समतोल राखण्याचे कसब मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यात आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती व गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने दि. ६ ऑक्टोबर रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड विलासनगर येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी व कार्यकारी संचालक यांची समन्वय सभा संपन्न झाली.
सदर बैठकीस साखर संघाचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य आबासाहेब पाटील, विलास सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक आप्पा काळे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, ट्वेंटी-वन शुगरचे उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, मांजरा साखरच्या ऊस विकास कमिटीचे अध्यक्ष कैलास पाटील, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, भीमराव मोरे, ए. जे. पाटील, सदाशिव बहिर, गणेश येवले, समीर सलगर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, नवनाथ आबाराव शिंदे, रामदास आबा गिरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माणिक गायकवाड, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, बालाजी जाधव, कालिदास बंडे, करण भोसले, महाराष्ट्र किसान आर्मी प्रमुख क्रांतिकारी संघटनेचे राम चलवाड, शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षचे कल्याण आप्पा हुर्दळे, तसेच लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी चालू गाळप हंगामामध्ये पाऊस नसल्याकारणाने कारखाने लवकर सुरू केल्यास सरासरी साखर उतारा कमी येणार असल्यामुळे व परिणामी उसाच्या भावावर परिणाम होत असल्यामुळे साखर कारखाने उशिराने चालू करावेत, अशी मागणी करण्यात आली तसेच पावसाअभावी ऊस उत्पादक शेतक-यांचे एकरी उत्पन्नात घट होणार आहे परंतु शेतक-यांनी जास्तीत जास्त उत्पन्न व्हावे या दृष्टीने जास्तीत जास्त खर्च ऊस उत्पादन घेण्यासाठी केलेला आहे त्याचा विचार करून गाळपास येणा-या उसास जास्तीत जास्त भाव ऊस उत्पादक शेतक-यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सदर प्रसंगी मांजरा परिवारातील पदाधिका-यांनी व कार्यकारी संचालक यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांच्या सर्व शंकांचे निरासन केले तसेच साखर कारखान्यांच्या व ऊस उत्पादकांच्या विविध अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, साखरेची रटढ वाढवण्यात यावी, साखरेस व इथेनॉल व इतर बाय प्रॉडक्ट यांना निश्चित जास्तीत जास्त भाव देण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती करावी जेणेकरून ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा ऊस दर देणे शक्य होईल असा विचार मांडण्यात आला.
तसेच औद्योगिक साखर व घरगुती साखर दरामध्ये फरक ठेवून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सर्व शेतकरी संघटना यांच्याकडून येणा-या गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा याबाबत एकमुखी मागणी करण्यात आली, याबाबत मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगामामध्ये एफ. आर. पी. पेक्षा जास्तीचा दर ऊस उत्पादक शेतक-यांना दिला आहे या गाळप हंगामात ही तीच परंपरा कायम राखली जाईल असे आश्वासन देण्यात आले व खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली.
















