निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी नगराध्यक्ष संजय हलगरकर यांनी सोमवारी (दि. ५) माकणी येथील तेरणा मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पात सध्या केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, या प्रकल्पावर ३६ हून अधिक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अपु-या पावसामुळे आगामी काळात निलंगा शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गळतीचे नळ व पाइपलाईन तातडीने दुरुस्त करणे, तसेच पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहनही पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक वीरभद्र स्वामी, ईश्वर पाटील, निळकंठ पेटकर, रमेश कांबळे, सचिन गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष रवी फुलारी, दत्ता मोहोळकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















