श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात गांजाच्या अवैध लागवडीचे प्रकार उघडकीस येत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दहेगाव येथे कालच ४४ लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. या घटनेपाठोपाठ आज, दि. १७ नोव्हेंबर रोजी मौजे दत्त मांजरी येथे काळा पाणी तलावालगत असलेल्या शेतात पोलिसांनी छापा टाकून २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त केली. या मुद्देमालाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मौजे दत्त मांजरी आणि श्री दत्त शिखर संस्थान यांच्या दरम्यान काळा पाणी तलाव असून तलावालगत घनदाट जंगलाच्या परिसरात सुनील पवार यांचे शेत आहे. या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास चोपडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांच्या पथकाने रात्री शेतात धाड टाकली. या कारवाईदरम्यान शेतात गांजाची २०० हून अधिक झाडे आढळून आली. पंचांच्या उपस्थितीत ही झाडे उपटून जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री अकरा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दहेगावपाठोपाठ दत्त मांजरी येथेही गांजाची शेती आढळून आल्याने माहूर तालुक्यात अवैध गांजा लागवडीचे जाळे किती विस्तारले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील संशयित शेतांची विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके, पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन चौधरी, प्रकाश गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोहूरले, आशिष कांबळे, ज्ञानोबा खंदाडे, पवन राऊत, पंच मनोज कीर्तने, मंडळ अधिकारी पाईकराव तसेच अन्य पंच व होमगार्ड यांनी सहभाग घेतला. सलग दोन दिवसांत गांजाच्या शेतीवर झालेल्या कारवाईमुळे माहूर तालुक्यातील अवैध लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















