मुंबई : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचं रस्ते अपघातात दुदैवी मुत्यू झाला आहे. तर त्यांची बहीण गंभीर जखमी झाली आहे.त्यांच्यावर धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच त्रिपाठी मुंबईहून धनबादला रवाना झाले आहेत.
सुत्रांच्या मते, पंकज त्रिपाठी यांचे मेहुणे राकेश तिवारी आणि बहिण सरिता तिवारी हे धनबादहून कोलकात्याला जात होते. दोघेही त्यांच्या डब्ल्यूबी ४४ डी २८९९ या कारमधून जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग जास्त होता. निरसा चौकात एका ऑटोला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि डिव्हायडरला धडकली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. असता स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला अॅम्ब्युलन्सने धनबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे राकेश तिवारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच पंकज त्रिपाठी मुंबईहून कोलकाता विमानतळावर उतरले आणि खासगी कारने धनबादला रवाना झाले आहेत. पंकज यांचे मेहूणे रेल्वेचे कर्मचारी होते त्यांची पोस्टिंग चित्तरंजन स्टेशनवर होती.