लखनौ : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री दिल्ली-सहरसा वैशाली एक्स्प्रेस या पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याला किरकोळ आग लागली. त्यामुळे २१ प्रवासी जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश लोकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. इटावमध्ये रेल्वेच्या डब्याला १२ तासांत आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ट्रेनमधील एकूण २१ प्रवासी बाधित झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धुरामुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली तर काहींना श्वसनाचा त्रास झाला. इटावाचे पोलीस अधीक्षक (एसपी) संजय कुमार यांनी सांगितले की, गाडी फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्टेशन परिसरात असताना पहाटे २.४० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या, त्यांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-सहरसा वैशाली एक्स्प्रेसच्या एस-६ कोचमध्ये आग लागली. आगीचा धूर पसरल्याने काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.