नवी दिल्ली : देशातील नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता यूजीसी-नेट परीक्षेबाबतही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर मुद्यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी या संपूर्ण घोटाळ्याचे धक्कादायक तपशील समोर आणले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर थेट निशाणा साधून पाच गंभीर आरोप केले आहेत.
राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार, युजीसी-नेट परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी १०० पानांची एक संशयास्पद पीडीएफ प्रसारित झाली होती. ही पीडीएफ थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या अंतर्गत प्रश्नपत्रिका सेटिंगमधील होती. अत्यंत गोपनीय असलेली ही माहिती केवळ एनटीएकडेच उपलब्ध असणे अपेक्षित असताना ती बाहेर आली. लीक झालेल्या या पीडीएफमधील तब्बल ९० प्रश्न समाजशास्त्र या विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते. इतकेच नव्हे तर, ही प्रश्नपत्रिका बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांमध्ये तब्बल २ लाख २५ हजार रुपयांना विकली जात होती.
पेपर लीक करणा-या याच नेटवर्कने आगामी काळात होणा-या सीएसआयआर-नेट, एचटीईटी आणि एडीएसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपरही लीक करून उपलब्ध करून देण्याचा मोठा दावा केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नीट आणि नेट सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षांमध्ये एकामागून एक घोटाळे समोर येत असतानाही मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांचे कष्ट कवडीमोल
मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांनी रात्र रात्र जागून, वर्षानुवर्षे घेतलेले कष्ट या सरकारच्या दृष्टीने कवडीमोलाचे ठरत आहेत. संपूर्ण देशाला ठाऊक आहे की, पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा ठोस कारवाईची अपेक्षा करणे पूर्णपणे व्यर्थ आहे. या प्रकरणाची ना कोणती निष्पक्ष चौकशी होईल, ना विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन
अखेर, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभरातील तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आता बदलाचे एकमेव हत्यार म्हणजे आपला सामूहिक आवाज असून देशभरातील विद्यार्थ्यांचा हा एकत्रित आवाज भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
















