कळंब : प्रतिनिधी
सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक तयार करून तो प्रस्ताव अनुदान मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देण्यासाठी शेतक-याकडून २० हजाराची लाच घेताना कळंब येथील कृषी अधिकारी संतोष बाबूराव हुरगट (वय ५०) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी दि. २ डिसेंबर रोजी कळंब येथे करण्यात आली. या प्रकरणी कळंब येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब येथील कृषी अधिकारी शेततळ््याचा प्रस्ताव अनुदान मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी २० हजार रूपयांची लाच मागत असल्याची तक्रार २२ वर्षीय शेतक-याने १ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली होती. एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केल्यानंतर कळंब येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शनिवारी दि. २ डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला होता. कृषी अधिकारी संतोष बाबुराव हुरगट याने पंचांसमक्ष तक्रारदार शेतक-याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी करून २० हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली. आरोपी संतोष हुरगट याला ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.