नवी दिल्ली : आम आदमी पक्षाकडून (आप) अरविंद केजरीवाल यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावेळी बैठकील ३३० सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी पक्षाकडून २३ सदस्यीय नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीचीही स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये पंकज गुप्ता यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एन. डी. गुप्ता यांच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. बैठकीमध्ये पक्षाने संघटनात्मक रचना मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले आहेत.
‘आप’चे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग धांडा यांनी केजरीवल यांच्या पुनर्निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आगामी प्रत्येक राजकीय आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘आप’ला निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. असे असले तरी, पक्षाच्या नेतृत्वाची धुरा ही केजरीवाल यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. केजरीवाल यांची राष्ट्रीय संयोजकपदी बिनविरोध निवड झाल्याने पक्षातील त्यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.
















