दिसपूर : महागाईच्या वाढत्या दबावात सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आसाम सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचा-यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होणार असून ८ व्या वेतन आयोगाच्या अपेक्षांदरम्यान हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आसाम सरकारने महागाई भत्ता आणि महागाई दिलासा यामध्ये २ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान ५८ टक्के दर आता ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. हा वाढीव लाभ कार्यरत कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, कौटुंबिक पेन्शनधारक तसेच इतर पात्र लाभार्थींना मिळणार आहे. जून २०२६ च्या वेतन आणि पेन्शनसोबत हा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
















