अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या मुद्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंदिर देणगी घोटाळ्याची एसआयटी चौकशी सुरू आहे. मात्र, कारवाई फक्त छोट्या कर्मचा-यांवर करून बड्या पदांवर बसलेल्या लोकांना वाचवले जात आहे. मंदिर परिसरातील लोकांचा सीडीआर तपासला तर ९९.९ टक्के भाजपचेच निघतील असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे थेट नाव घेत सरकारवर निशाणा साधला. एसआयटीच्या अहवालात चंपत राय यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही, यावरूनच स्पष्ट होते की त्यांना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे यादव म्हणाले. तसेच, ट्रस्टच्या कोषाध्यक्षांचे नावही यात समोर आले असून त्यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि त्यांनी समाजाला मर्यादेत राहण्याचा संदेश दिला. परंतु, काही लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी याच मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सनातन धर्मात देवांच्या देणगीची चोरी करणे हे सर्वात मोठे पाप आहे. या प्रकारामुळे संपूर्ण सनातनी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
राम मंदिरातील देणगी घोटाळ्यात आतापर्यंत किती चोरी झाली याबाबत अचूक आकडा अजूनही समोर आलेला नाही. या प्रकरणात एसआयटी तपास करत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. आणि याचे गंभीर परिणाम भारताला येणा-या काळात भोगावे लागतील अशी भीती अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.
















