34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराजकारणाच्या डावात भंडारा, परडी, लिंबू-मिरच्या अन् भानामती

राजकारणाच्या डावात भंडारा, परडी, लिंबू-मिरच्या अन् भानामती

कोल्हापूर : एकीकडे राजर्षि शाहू महाराजांचा पुरोगामी विचार सांगायचा आणि दुसरीकडे मात्र मतांसाठी अनिष्ट प्रथांना बळ द्यायचे, असा प्रकार आता हळूहळू पुन्हा डोके वर काढू लागला आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच रात्रीच्या गडद अंधारात या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काही गावांत राजकीय वैर इतके टोकाचे आहे की, आपल्याच उमेदवाराला मतांसाठी अशा पद्धतींचा वापर करून भावनिक पेरणी होऊ लागली आहे.

भंडा-याची, परडीची शपथ, लिंबू-मिरच्या, भानामती अशा प्रकारांबरोबरच विविध देव-देवतांना गा-हाणी आणि चक्क काही ज्योतिषी स्वत:च उमेदवारांना फोन करून सल्ल्याबाबत विचारणा करू लागले आहेत. जिल्ह्यातील काही मंदिरे कौल लावण्याबरोबरच गा-हाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांची आता या मंदिरांकडील धाव वाढली आहे.

आपल्याच उमेदवाराला आपल्या भागातून मताधिक्य देण्यासाठीची ही गा-हाणी आहेत, तर काही ठिकाणी विरोधकही आपल्याकडे कसे वळतील, यासाठीही काही कार्यकर्ते गा-हाणी घालू लागले आहेत. अमूक-अमूक याचा निवडणुकीत पराभव होऊ दे, डिपॉझिट जप्त होऊ दे, इथपासून ते कमीत कमी इतके मताधिक्य मिळू दे, इथपर्यंतच्या गा-हाण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

मतदान केंद्रावर पहिले मतदान कुणी करावे, यासाठी अनेकांचा विशिष्ट नावांचाच आग्रह असतो; मात्र आता प्रचाराचा नारळ कुणी फोडायचा, इथपर्यंत ही अंधश्रद्धा पाझरली आहे. प्रचाराचा प्रवास जसा सांगतेकडे सुरू होईल तसे हे प्रकार वाढतच जाणार आहेत. मतदान केंद्रे अजून लांब असली तरी विरोधकांच्या घराच्या आसपास गुपचूप लिंबू किंवा इतर धार्मिक वस्तू टाकणे किंवा पुरणे, असे प्रकारही आता सुरू झाले आहेत.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांतील ग्रामीण भागात हळूहळू हे लोण पसरू लागले आहे. देशातील एका प्रसिद्ध देवस्थानचा पुजारी असे सांगून एका ज्योतिषाने थेट एका उमेदवारालाच गाठले. हा उमेदवार असले काही मानत नाही; पण हा ज्योतिषीही तितकाच चिवट. तो विविध दाखले देत उमेदवाराला आपल्या भविष्यवाणीची महती सांगू लागला. त्यासाठीची त्याची फी तर कैक हजारांच्या घरात. अखेर या उमेदवाराने थेट त्याला दहा हजार रुपये दिले आणि कुठल्याही सल्ल्याशिवाय त्याला तेथून जायची विनंती केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR