उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरालगत असलेल्या महार वतनी आणि महार हाडोळा नावाने ओळखल्या जाणा-या जमिनीबाबत बोगस कागदपत्र बनवल्या प्रकरणी न्यायालयाने तिघांना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी दिलीप नारायण सोनकांबळे, मारुती गंगाराम चौधरी, देविदास किशनराव कांबळे यांना भारतीय दंड विधान संहितेतील कलमान्वये दोषी ठरवत उदगीर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. आर. घराळ यांच्या न्यायालयाने तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
आकाश रमेश पारखे आणि महेश शिवाजी पारखे यांनी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सन २००२ ते सन २००३ साली कै. मारुती सटवा बोडके, कै. तुक्या सातू, कै. दारकुस सोनकांबळे व कै. हशा जयराम्या यांच्या वारसांचे दाखले नगरपालिकेतून आदा केलेले होते. त्यामध्ये आरोपी क्रमांक एक ते चार यांची नावे इतर वारसामध्ये सामील करून दाखले तयार करण्यात आले. व त्याद्वारे तहसील कार्यालयाज अर्ज सादर करून महार हाडोळा गट क्रमांक २३८, २४४ असे एकूण ५८ एकर ४२ आर जमीन स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी महसूल दरबारी अर्ज करून आदेश मिळवले, व जमीन स्वत:च्या नावे करण्यासाठी आरोपींनी वारसा प्रमाणपत्राचा आधार घेतला आहे.
जिल्हाधिकारी लातूर यांनी नगरपालिका उदगीर येथील मुख्य अधिकारी यांना आदेशित केल्याप्रमाणे नगरपालिकेच्या वतीने
प्रशासकीय अधिकारी मल्लिकार्जुन शरणाप्पा हलकुडे यांनी उदगीर शहर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तपास पूर्ण करण्यात आला, व आरोपी क्रमांक एक ते चार यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले. केस चालू असताना यातील आरोपी उद्धव सटबा बोडके हा मरण पावला. या प्रकरणाची आरोपी म्हणून दिलीप नारायण सोनकांबळे, मारुती गंगाराम चौधरी आणि देविदास किसनराव कांबळे यांच्या विरुद्ध केस चालली. या प्रकरणी न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम आरोपींना तीन वर्ष सप्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
















