33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीजिल्ह्यातील २९ रास्त भाव दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित

जिल्ह्यातील २९ रास्त भाव दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित

परभणी : आनंदाचा शिधा विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरीत रक्कम ७ दिवसांचे आत रास्तभाव दुकानदार यांनी शासनाकडे न भरल्याने जिल्ह्यातील २९ रास्तभाव दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित करण्यात आले आहे. तर ९३ रास्तभाव दुकानदारांच्या ३३ लाख ८० हजार ७४५ एवढी अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच धान्य वितरणात कोणताही कसूर करणा-या रास्तभाव दुकानदाराचे प्राधिकार पत्र निलंबीत करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचा इशारा परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीर यांनी दिला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी योजनेवरील पात्र लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सनानिमित्त आनंदाचा शिधा जिन्नस संच सन २०२३मध्ये वितरीत करण्यात आला होता. लाभार्थ्यांना शिधाजिन्नस संच वितरीत करण्यासाठी प्रति संच रूपये १०० प्रमाणे वितरीत करून विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरीत रक्कम ७ दिवसाचे आत रास्तभाव दुकानदार यांनी शासनास चालनद्वारे भरणा करावयाची होती.

परंतु अनेक रास्तभाव दुकानदारांनी अद्यापपर्यंत शिधा जिन्नसची रक्कम शासनास जमा केलेली नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालय, परभणी यांच्याकडून संबंधित रास्तभाव दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पाथरी तालूक्यातील २, जिंतूर ४, सेलू १, गंगाखेड २२ असे एकूण २९ रास्त भाव दुकानदारांचे प्राधिकारपत्र पत्र निलंबित करण्यात आले आहे. तर ९३ रास्तभाव दुकानदारांचे ३३ लाख ८० हजार ७४५ एवढी अनामत रक्कम जप्तीचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेवरील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यामध्ये अनियमीतता करणा-या परभणी तालुक्यातील मौजे किन्होळा, खानापूर येथील बि.टी. गुळवे व स्नेहा महिला बचत गट यांच्या रास्तभाव दुकानाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले आहेत.

ज्या रास्तभाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा जिन्नससाठी भरणा करावायाची रक्कम ७ दिवसात न भरल्यास तसेच लाभार्थ्यांना धान्य वितरणात कोणत्याही प्रकारची कसूर केल्यास संबंधिताचे नावावरील रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबत करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर परभणी यांनी कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR