वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कबूल केले आहे की, त्यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानमध्ये इराणच्या भीतीने विमान बदलले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ज्या विमानाने ते नाटो परिषदेला गेले होते, त्यावर हल्ला होण्याचा सर्वाधिक धोका होता.
ट्रम्प यांनी हे देखील सांगितले की, त्यांना सुरक्षा कारणांमुळे विमानतळावरील केटरिंग ट्रक मधून दुस-या विमानापर्यंत नेण्यात आले. हल्ला झाला असता तर त्याच विमानाला लक्ष्य केले असते. सुरक्षा यंत्रणा जे सांगतात, तेच मी करतो. मला सतत धमक्या मिळत असतात. यापूर्वी वॉशिंग्टन पोस्टने दावा केला होता की, ८ जुलै रोजी अंकारा येथून निघताना ट्रम्प कॅमे-यासमोर बोइंग ७४७-८ एअर फोर्स वनमध्ये बसले होते. हे विमान त्यांना कतारने भेट दिले होते आणि याच विमानातून त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू केला होता. रिपोर्टनुसार, त्यानंतर विमानतळावर सामान आणि अन्न पोहोचवणा-या केटरिंग गाडीच्या मदतीने त्यांना गुपचूप अमेरिकन वायुसेनेच्या सी-३२ए या व्हीआयपी लष्करी विमानापर्यंत नेण्यात आले.
माध्यमांनाही माहीत नव्हते की ट्रम्प दुस-या विमानात आहेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही दौ-यावर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत काही पत्रकारही प्रवास करतात. सुरक्षिततेच्या कारणांमुळे प्रत्येक माहिती सार्वजनिक केली जात नाही, परंतु या पत्रकारांना एवढे नक्कीच माहीत असते की राष्ट्राध्यक्ष कोणत्या विमानात आहेत आणि कुठे जात आहेत.
आम्ही धोकादायक उड्डाणावर होतो
तुर्कियेहून उड्डाण करताना पत्रकारांना वाटले की, ट्रम्प देखील त्याच जुन्या एअर फोर्स वनमध्ये आहेत, पण सत्य वेगळे होते. उड्डाणादरम्यान पत्रकारांना त्यांच्या खिडक्यांचे शेड खाली ठेवण्यास सांगितले होते. म्हणजेच, त्यांना बाहेर पाहण्याची परवानगी नव्हती. अशी खबरदारी सहसा तेव्हा घेतली जाते, जेव्हा विमान एखाद्या धोकादायक भागातून जात असते. नंतर पत्रकारांनी ट्रम्पना विचारले की खिडक्यांचे शेड बंद ठेवण्यास का सांगितले होते. ट्रम्प म्हणाले, कदाचित आम्ही एका धोकादायक उड्डाणावर होतो.
















